अमरावती - दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते मोबाईलवर प्रसारित करण्यात आल्याची धक्कादायक बाब तिवसा ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’मध्ये मोडणाऱ्या या प्रकरणी तिवसा पोलिसांनी १९, २० व २२ वर्षीय अशा संशयित तीन तरूणांविरूद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ ब व पोक्सोमधील कलम ६, १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांना अद्याप अटक झाली नसल्याची माहिती तिवसा पोलिसांकडून देण्यात आली.
१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या अल्पवयीन मुलासह दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा अश्लील व्हिडिओ मोबाईलवर व्हायरल झाल्याचे संबंधित पालकाला समजले. त्या कृत्यामुळे त्या दोन्ही मुलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे असे अश्लील कृत्य करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार त्या पालकाने १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११. १३ च्या सुमारास नोंदविली. तत्पूर्वी आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांनी एकंदरित घटनाक्रम जाणून घेतला.
तक्रारीनुसार, साधारणत: आठ दिवसांपूर्वी तीनही संशयितांनी खेळत असलेल्या त्या मुलांना बोलावून नवीन व्हिडिओ बनविण्याची बतावणी केली. तथा अश्लील कृत्य करण्यास सांगून ते मोबाईलमध्ये चित्रित केले. ते तिघेही संशयित तेवढ्यावरच न थांबता त्यांनी तो अश्लील व्हिडिओ बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर पाठवून व्हायरल केला. या प्रकारामुळे ते दोघेही अल्पवयीन मुले भयग्रस्त झाली आहेत. याबाबत तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयितांचा तपास चालविला आहे.
...तर जावे लागते तुरूंगात
चाइल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरू आहेत. चाइल्ड पॉर्न व्हिडिओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडिओ, फोटो कुणाला पाठवला तर, संबंधितास तुरुंगात जावे लागू शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे भारतात कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही वारंवार अशा घटना घडत आहेत. बालकांचे लैंगिक शोषण ही फार गंभीर बाब असून लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, इंटरनेटवर अपलोड करणे किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणे हा गुन्हा आहे.
दरम्यान, आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव आणि अमित ढवळे हे करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली.