अंजनसिंगी : येथे सन २००३ ते २००४ या आर्थिक वर्षात सुवर्ण ग्राम जयंतीनिमित्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पाच गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून ते गाळे सन २०१० पर्यंत बेवारस अवस्थेत होते. त्यानंतर तत्कालीन सरपंच कैलास ठाकरे यांनी गाळ्यांचे लिलाव पद्धतीने वाटप केले. मात्र, लिलाव घेणाऱ्यांनी सदर गाळ्यांचे भाडे ग्रामपंचायतीकडे दहा वर्षांत जमा केलेले नाही. ग्रामपंचायतीला कुठलीही पूर्वसूचना न देता परस्पर भाड्याने दिले आणि त्याचे भाडे स्वत: वसूल करून ग्रामपंचायतीत त्याचा भरणादेखील केलेला नाही.
ग्रामपंचायतीने भाड्याचा भरणा करण्याविषयी गाळेधारकांना वारंवार नोटीस देऊन अवगत केले. परंतु गाळेधारकांनी ग्रामपंचायतीच्या वसुली नोटीसला केराची टोपली दाखवली. येथील सरपंच रुपाली गायकवाड व ग्रामविकास अधिकारी डी़ डी़ जोल्हे यांनी आठ दिवसांपूर्वी गाळेधारकांना नोटीस देऊन थकीत भाडे भरा, अन्यथा गाळे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. मात्र, भरणा न केल्याने अखेर २५ मार्च रोजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या गाळ्यांना कुलूप लावण्यात आले.
-------------------