अटक केव्हा करणार ? : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रकारअमरावती : अंजनगाव-दयार्पूर महामार्गावर विहिगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी दारु पकडण्यात आली. कापूसतळणी येथिल देशी दारुच्या दुकानातून चारचाकी वाहनाने याअवैध दारुची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने ग्रा.पं.सदस्य भीमराव श्रीरंग खडारे (रा.निंभारी)याला अटक केली. मात्र, दारूचा पुरवठा करणाऱ्या परवानाधारक दुकानदाराला अद्यापही अटक करण्यात आली नाही. यादुकानमालकास केव्हा व कोण अटक करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय अधिकारी काही महिन्यांपूर्वी रुजू झाले असून त्यांच्या अंतर्गत तीन पोलीस ठाणी येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारुविक्रीला उधाण आले आहे. मात्र, याकडे तिन्ही ठाण्यातील पोलिसांचे लक्ष नाही. केवळ मलई खाण्याचे काम येथिल अधिकारी करीत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ग्रामीण भागात एकमेव कापूसतळणी येथे दारूचे दुकान सुरू असून या दुकानातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अवैध दारूचा पुरवठा केला जातो. या आधीही बरेचदा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. मात्र, या दुकानदाराचे पोलीस यंत्रणेवर वर्चस्व असल्यामुळे कारवाई झाली नाही. मात्र, १६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने दारुची वाहतूक करणाऱ्यासह दुकानमालकावर सुद्धा कारवाई केली. त्यामुळे गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने हायवेपासून पाचशे मीटर अंतरावरील दारुविक्री बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला हे अवैध दारुविक्रेते केराची टोपली दाखवित आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन व दारूबंदी विभागाच्या आशीर्वादाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात दारूविक्री सुरु असल्याचे हे ताजे उदाहरण आहे. या कारवाईत दुकानमालक विजय नारायणलाल जयस्वालवर गुन्हा दाखल झाला. परंतु त्याला अद्याप अटक का झाली नाही, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित झाला असून या दारुदुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी महिला , सामाजिक संस्था व राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. आरोपी विजय नारायणलाल जयस्वाल याला अटक करणे तसेच दारूविक्रेत्याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या अहवालासह इतर सर्व बाबींची पूर्तता रहिमापूरचे ठाणेदार करतील- आशिष बोरकर, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
दारूचा पुरवठा करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांचे अभय
By admin | Published: April 20, 2017 12:09 AM