अमरावती : सध्या दिवाळी सण सुरू झाला असून त्यानिमित्ताने बरेच लोक ऑनलाईन खरेदी, शॉपिंग करत असतात. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार होत असून सायबर गुन्हेगार सक्रिय झाल्याचे दिसून येत असल्याचे निरिक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. त्यासाठी ऑनलाईन खरेदी करतांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता काळजी घेण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
ऑनलाईन खरेदी करतांना वेबसाईटची सत्यता पडताळून पाहून ट्रस्टेड वेबसाईट वरूनच खरेदी करावी. कुठल्याही कंपनीचा कस्टमर केअरचा क्रमांक शोधताना तो संबंधित कंपनीचाच आहे का, याबाबत खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी, त्यासाठी ट्रस्टेड वेबसाईट वरूनच कस्टमर केअरचा क्रमांक घेण्यात यावा, ऑनलाईन खरेदी करतांना नेहमी https ने सुरु होणा या संकेतस्थळावरुनच खरेदी करावी. नियमित वापरले जाणारे वेब ब्राउझर अपडेट करण्यात यावे. मोबाईल किंवा संगणक मध्ये ॲन्टी व्हायरसचा वापर करण्यात यावा तसेच ते वेळोवेळी अपडेट करण्यात यावे. कोणत्याही अनोळखी व्यक्ती अथवा कंपनीकडून आलेल्या ई-मेल व मेसेजच्या लिंकवर क्लिक करु नये. तसेच लिंकव्दारे एनी डेस्क, क्वीक सपोर्ट, टिम व्हयुअर यासारखे कोणतेही रिमोट ॲप इन्स्टॉल करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅश ऑन डिलिव्हरी
ऑनलाईन खरेदी करतांना शक्यतो ऑनलाईन पेमेंट न करता कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करावा. ऑनलाईन पेमेंट केल्यास ज्या वेबसाईटला सेक्युअर पेमेंटस गेटवे आहे त्यावरच पेमेंट करावे. ऑनलाईन अकाउंटला टु फॅक्टर ऑथेन्टिकेशन ॲक्टिव्हेट करण्यात यावे. आपल्या सोबत कुठल्याही प्रकारचा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ जवळील पोलीस ठाणे अथवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्या. पोलीस ठाण्यात येणे शक्य न झाल्यास ऑनलाईन वा १९३० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
- गजानन तामटे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे