अमरावती : जुने बायपासलगतच्या एमआयडीसी येथील नॅशनल पेस्टिसाईड्स ॲन्ड केमिकल नामक फॅक्टरीला शनिवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास शाॅर्ट सर्किटने भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तब्बल २१ तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका अग्निशमन यंत्रणेने आग आटोक्यात आणली. या आगीच्या विळख्यात मशीनरी, केमिकल, फर्टिलायझर, साहित्य असे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री १० वाजतापर्यंत अग्निशमनचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात व्यस्त होते.
एमआयडीसीत ८ हेक्टर जागेवर नॅशनल पेस्टिसाईड्स ॲन्ड केमिकल फॅक्टरी आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजतापासूनच विजेचा कमी-जास्त उच्च दाब सुरु होता, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणणे आहे. शॉर्टसर्किटने आग लागताच प्लास्टिक साहित्यांनी पेट घेतला. अचानक आगीचा भडका उडताच सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. फॅक्टरीत केमिकलचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. मात्र, आग वाहने कमी पडल्याने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, बडनेरा येथून अग्निशमन वाहने मागविण्यात आली. ६० बंब आणि ३५ केमिकल फोमचा वापर करून २१ तासांनंतर ही आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक अनवर खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
-------------------
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. दरम्यान पालकमंत्री ठाकूर यांनी शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.
------------------
नुकसानाची माहिती घेण्यास प्रारंभ
अग्निशमन यंत्रणेकडून या भीषण आगीची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्रपणे फाॅर्म भरून घेण्यात येत आहे. एकूणच आगीच्या विळख्यात सापडलेले साहित्य, केमिकल, मशीनरी, कच्चा मालाचा साठा आदींची माहिती गोळा करण्यात येत आहे.