संदीप मानकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीनंतर परतीच्या प्रवासाला एसटी महामंडळ अमरावती विभागामार्फत अमरावतीहून पुणेकरिता सहा शिवाशाही बसेस सोडण्यात येत आहे. मात्र, गत तीन दिवसांपासून दोनच बसचे आरक्षण होत आहे. त्यालाही अल्प प्रतिसाद असून, गत तीन दिवसांपासून रोज १० ते ४० प्रवाशांचे आरक्षण होेत असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांत घट झाली आहे. रोजचे आरक्षण २० ते ३० हजारांचे होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर रोज अमरावतीहून सर्व मार्गावर ३७५ बस सोडण्यात येत आहेत. त्याचा प्रवास प्रतिदिन १ लाख १५ हजार किमी होत आहे. त्यातून एसटीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे श्रीकांत गभणे म्हणाले. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीनंतर कमी बस सोडण्यात येत आहेत.
पुण्याकरिता अतिरिक्त फेऱ्या दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अमरावती एसटी विभागाने पुणेकरिता रोज सहा बसचे नियोजन केले होते. यामध्ये पाच शिवशाही बस व एक साधी नाॅन एसी स्लीपर बस सोडण्यात येत होती. पूर्ण क्षमतेने प्रवासी नेण्याची परवानगी शासनाने दिली. ४४ सीटर क्षमतेची बस आहे. मात्र लांबपल्याच्या मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसत नाही.
ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविल्या दिवाळी, भाऊबीजनिमित्त पाहुणे, बहिणी घरी येतात. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी परत जातात. त्यामुळे अमरावती मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील तालुक्यांमध्ये बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
चिखलदरा पर्यटनासाठी फेऱ्यामंदिरे भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शेगावकरिता विशेष बस तसेच फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. चिखलदरा येथेसुद्धा पर्यटनासाठी नागरिक अधिक असल्याने या मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
परतीच्या प्रवासाची आरक्षण स्थिती अमरावतीहून पुण्याकरिता परतीच्या प्रवासाला गत तीन दिवसांत आरक्षण बुकींगला अल्प प्रतिसाद मिळाला. पुणेकरिता शिवाशाहीचे प्रतिव्यक्ती तिकीट १०९० रुपये, तर साध्या बसचे ९०० रुपये आहे. फक्त दोनच बसेसला आरक्षण मिळाला. यामध्ये सोमवारी १५, मंगळवारी २५, तर बुधवारी २० प्रवाशांचे आरक्षण पुणेकरिता झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खासगी बसचे बूकिंग हाऊसफुल्ल पुण्याकरिता नागपूरहून अमरावती मार्गे दररोज विविध कंपन्यांच्या ३० ते ४० खासगी बस सुटतात. एसटी महामंडळाच्या बसच्या तुलनेत खासगी बसचे बूकिंग हाऊसफुल्ल होते. अमरावतीहून पुण्याकरिता प्रतिप्रवासी ९०० ते एक हजारापर्यंत तिकीट दर आकरण्यात आल्याचे एका ट्रॅव्हल्स कंपनीचे कर्मचारी मंगेश गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता ५० बसअमरावतीहून लांबपल्ल्याच्या प्रवासाकरिता दिवाळीनंतर ५० बसेस रोज सोडण्यात येत आहे. यामध्ये अमरावती- पुणे, अमरावती औरंगाबाद, पंढरपूर, छिंदवाडा, नांदेड, माहूर, औरंगाबाद तसेच इतर मार्ग़ावर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.