अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डोळे आणि बीपी, शुगरची ओपीडी ही वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे डोळे कमजोर झालेल्या तसेच शरीर थकलेल्या वयोवृद्धांना उपचारासाठी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. काही वयोवृद्धांना पायऱ्या चढणे शक्य होत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना उचलून ओपीडीमध्ये न्यावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने डोळे आणि बीपी, शुगरची ओपीडी ही खाली ठेवावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रोज हजार ते बाराशे रुग्ण हे रोजच्या ओपीडी (बाह्य रुग्ण तपासणी विभाग) येतात. यात रुग्णालयातील डोळे, बीपी, शुगर तसेच लहान मुलांची ओपीडी ही वरच्या मजल्यावर आहे. या ओपीडीमध्ये जाण्यासाठी लिफ्ट किंवा रॅम्पची सुविधा नसल्याने रुग्णांना पायऱ्या चढूनच ओपीडीमध्ये जावे लागते, तर बीपी, शुगर आणि डोळ्यांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणारे सर्वाधिक रुग्ण हे वयोमानानुसार डोळे कमजोर झालेले तसेच शरीर थकलेले, पायदुखीचा त्रास असलेले वयोवृद्ध असतात.
त्यामुळे ओपीडीत जाण्यासाठी या रुग्णांना नाहक पायऱ्या चढण्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे डोळ्याने अंधुक दिसणारे रुग्ण भिंतीच्या सहारा घेत पायऱ्या चढताना, काही रुग्ण थांबून-थांबून पायऱ्या चढताना, तर काही वयोवृद्ध रुग्णांना उचलून ओपीडीत नेत असल्याचे चित्र रोजच ओपीडीच्या वेळेत पाहायला मिळते. या पायऱ्या चढताना काही वयोवृद्ध पडल्याच्याही घटना याठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने वयोवृद्ध रुग्णांचा विचार करता डोळ्यांची आणि बीपी, शुगरची ओपीडी खाली सुरू करण्याची मागणी होत आहे.