अंजनगाव सुर्जी (अमरावती) : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांना तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंविच्या कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २५ मार्च रोजी संचारबंदीच्या अनुषंगाने आदेश काढले. त्यामधील परिच्छेद क्रमांक ६ नुसार शहरातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणी किरकोळ भाजीविक्रीची दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. परंतु, मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी न करता गर्दीच्या ठिकाणी भाजीपाला व किरकोळ विक्रेत्यांना परवानगी दिली. त्याअनुषंगाने अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी ३० मार्च रोजी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्यादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे आढळून आले.
भाजीविक्रेते व अन्य किरकोळ विक्रेते आपल्याच जुन्या जागांवर बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना परवानगी दिल्याचेसुद्धा आढळून आले. सदर बाब जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. सक्षम प्राधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत आपणाविरुद्ध भादंविच्या कलम १८८ नुसार फौजदारी का करू नये, याबाबत मुख्याधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नोटिशीचे उत्तर ३१ मार्चला सकाळी ११ वाजेपर्यंत तहसीलदारांसमोर सादर करावे लागणार आहे.