लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाहतूक नियमनासाठी नेमलेल्या पॉइंटवर ड्युटी न बजावता दुसऱ्याच मार्गावर आढळलेल्या आठ पोलिस अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. त्यांचे लेखी उत्तर वजा स्पष्टीकरण आल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. त्या आठ अंमलदारांचा कसूर पाहता त्यांच्यावर निलंबनासह वेतनवाढ रोखण्यासह नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्याची कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते, असे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले.
मागील महिन्याच्या अखेरिस पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी एका मार्गावरून आकस्मिक गस्त घातली होती. त्यावेळी नेमलेला पॉइंट सोडून चार वाहतूक पोलिस दुसऱ्याच मार्गावर कर्तव्य बजावताना दिसून आले होते. त्यानंतर वाहतूक शाखेचे एसीपी संजय खताळे यांनीदेखील शहरातील काही ठिकाणची आकस्मिक तपासणी केली असता त्यांनाही चार कर्मचारी नेमलेले पॉइंट सोडून इतरत्र दिसून आले होते. त्याबाबत सीपी नवीनचंद्र रेड्डी यांना अवगत करण्यात आले. तर, वाहतूक एसीपींनी अधिनिस्थ असलेल्या आठही अंमलदारांचा कसुरी अहवाल पोलिस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर यांच्याकडे पाठविला. त्यानुसार, दुसऱ्याच ठिकाणी ड्युटी करणाऱ्या त्या आठही अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
... म्हणून वाहताहेत बदलाचे वारे अमरावती शहरातील काही ठिकाणी वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून, सीपी नवीनचंद रेड्डी व डीसीपी कल्पना बारवकर यांच्याकडे वाहतुकीबाबत अनेक तक्रारी गेल्या आहेत. दिवाळीवेळी दीपक चौक सारख्या भागात चक्क ठाणेदारांना ट्रॅफिक कंट्रोलिंग करावे लागले. काही अधिकारी घरातूनच ट्रैफिक कंट्रोलिंग करीत असल्याचीही ओरड आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालानंतर वाहतूक शाखेत मोठ्या बदलाची दाट शक्यता आहे.
"आकस्मिक पाहणीत आठ वाहतूक अंमलदार नेमणकीऐवजी दुसऱ्याच परिसरात दिसून आले होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लेखी खुलासा प्राप्त झाल्यावर प्रशासकीय कारवाई नक्कीच केली जाईल." - कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त.