अमरावती : पत्ता विचारण्याची बतावणी करून एका कारचालकाच्या गळ्यातील चेन हिसकावण्यात आली. ६ एप्रिल रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास साईनगर परिसरातील निसर्ग लॉन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी विवेक धोबे (३४, रा. पूर्वा कॉलनी, अमरावती) यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. ती चेन सुमारे १२ ग्रॅम वजनाची व ६० हजार रुपये किमतीची असल्याचे धोबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शनिवारी दुपारी विवेक धोबे हे कारचे काम करण्याकरिता बडनेरा रोड येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारमागून दोन अनोळखी मुले एका मोटर सायकलवर आले. पैकी मोटरसायकल चालविणाऱ्याने चालत्या गाडीतच धोबे यांना एक कागद दाखवित पत्ता विचारला. त्यामुळे धोबे यांनी आपली कार निसर्ग लॉन्सच्या बाजूला रोडवर थांबवली. तेव्हा ते कारमध्ये एकटेच होते. ती दोन्ही मुले तोंडाला रुमाल बांधून होती. एकाने काळ्या रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेले होते. ते मराठीत बोलत होते. ते कागद दाखवून पत्ता विचारत असल्याने धोबे यांनी आपल्याकडील कारची काच खाली केली तथा तो कागद न्याहाळत होते. तेवढ्यात त्या मोटर सायकलवरील अनोळखी चालकाने धोबे यांच्या शर्टची कॉलर पकडली. जे आहे ते दे, अशी धमकी देत शिवीगाळदेखील केली. विरोध केला असता, त्याने धोबे यांच्या डोक्यावर बुक्की मारली. डाव्या हाताला चावादेखील घेतला.
आरोपी हे ओढाताण करीत असताना त्याला धोबे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दिसली. त्यावेळी मोटरसायकलवर मागे बसलेल्या अनोळखी मुलाने त्याच्या जोडीदाराला ती चेन हिसकावण्याचा इशारा केला. तेव्हा त्या मोटरसायकलस्वाराने धोबे यांच्या गळ्यातील चेन बळजबरीने तोडून घेतली. ते दोघेही त्यांच्या दुचाकीने तेथून क्षणात रफुचक्कर झाले. तर, दुसरीकडे धोबे यांनी बडनेरा पोलिस ठाणे गाठून आपबीती कथन केली.