अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात बुलडाणा येथील मतदान केंद्र क्रमांक १२० वर झालेल्या मतदानाचा डेटा नष्ट झाला. याप्रकरणी मतदान केंद्रावर कार्यरत चार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई शिथिल करण्याची मागणी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी बुलडाणा जिल्हा निवडणूक अधिकाºयांना केली आहे.
मतदान केंद्र क्रमांक १२० येथे चार शिक्षक कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मशीन आॅपरेट करताना चुकीचे बटन दाबले गेले. यामुळे मतदान 'डिलीट' झाले. हे तांत्रिक कारण असून, चूक अनवधानाने झाली आहे. तथापि, शिक्षकांना निवडणूक आयोगाद्वारे तातडीने निलंबित करण्यात आले. तंत्रज्ञान हाताळताना झालेल्या चुकीमुळे थेट निलंबन योग्य नाही. त्यांच्यावर झालेली कारवाई शिथिल करावी, असे पत्र विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी बुलडाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांना पाठविले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाºयांची भेट घेणार असल्याचे आ. देशपांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.