अमरावती : संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संविधान जपणे आणि देशातील लोकशाही टिकविण्याची गरज आहे. २०२४ मध्ये जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली, तर यापुढे देशात पुन्हा निवडणुकाच होणार नसल्याचे भाकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
निर्भय बनो विचार मंचतर्फे रविवारी अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान’ या विषयावर श्याम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील आठ ते दहा वर्षांमध्ये देशभरात समाजामध्ये समाजविघातक वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने सुरू आहे. देशातील राष्ट्रीय एकात्मतेला तडा देण्याचे काम सुरू आहे. आज सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न सुरू आहे. भारताचे उन्नतीचे एकमेव माध्यम हे भारतीय संविधान आहे.
परंतु, सध्या संविधानविरोधीच कारवाई होत आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चारही मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देशात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य जपली जात नाहीत. देशातील न्याय व्यवस्थेवरही सरकारचा दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या उन्नतीचे एकमेव माध्यम असलेले भारतीय संविधान वाचविण्यासाठी आता एकत्र लढा देण्याची गरज आहे, अन्यथा दोन हजार वर्षांपूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था देशात निर्माण होईल. २०२४ मध्ये जर देशात पुन्हा भाजपा सत्तेत आली, तर मात्र देशात हुकूमशाही प्रस्थापित होऊन निवडणुकाच होणार नसल्याचे श्याम मानव म्हणाले.