अमरावती : रक्षाबंधन साजरे करण्यासाठी मध्य प्रदेशातील भैसदही तालुक्यातील गावाकडे निघालेल्या भावाच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्याच्यासह त्याची बहीणदेखील घटनास्थळीच दगावली.
वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा गावालगतच्या पेट्रोलपंपाजवळ बुधवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृत बहीण रक्षाबंधनासाठी भावासोबत माहेरी जात होती. वलगाव पोलिसांनुसार, रिना गणेश ताडीर (३५, रा. आनंदवाडी, कठोरा रोड, अमरावती) व नारायण देवानंद जावरकर (२७, रा. सुपाडा, ता. भैसदही, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
नारायण जावरकर हा रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुधवारी अमरावतीत राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. बुधवारी दुपारी २:५० च्या सुमारास भोजन करून नारायण जावरकर हा बहिणीसह दुचाकीने चांदूर बाजारकडे निघाला. नांदुरा, पुसदामार्गे तो शिराळा गावापुढे पेट्रोल पंपासमोर पोहोचला असता, चांदूर बाजारहून येत असलेल्या एम.एच. २९, एडी ४३३० या कारने त्याच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात दोघेही बहीण-भाऊ घटनास्थळीच दगावले. चालकासह कारमधील तिघेदेखील जखमी झाले, तर दोन्ही वाहने चेंदामेंदा झाली.
अपघाताची माहिती तत्काळ वलगाव पोलिसांसह चांदूरबाजार पोलिसांना देण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शींनी रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या बहीण-भावाला चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर दुसरीकडे वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तथा कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.