वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा विमा भरूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना सरकार व विमा कंपनीकडून लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकरी संघटनेने १४ सप्टेंबर रोजी कृषी कार्यालयाला घेराव घातला होता. या आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
विम्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. रास्ता रोको आंदोलनसुद्धा करण्यात आले. परंतु, या मागणीला सरकारने व विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या अंजनगाव सुर्जी शाखेच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने दुपारी १ ते ५ या वेळेत कृषी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या घेराव सभेत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शन करताना विमा परतावा देताना लावण्यात येणारे निकष याबाबत माहिती दिली. सात वर्षांचे उंबरठा उत्पन्न, सरासरी व वातावरण बदल या सर्व बाबी गृहीत धरून निकष लावले जातात. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना विमा मिळूच नये, अशाच निकषावर जोर दिला जातो. संघटनेकडून यावर आक्षेप घेण्यात आला.
गतवर्षी सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे प्रत्येक मौजाचे पंचनामे कृषी विभागाकडून मागण्यात आले आहेत. पंचनामे खोटे आढळल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचे संकेत शेतकरी संघटनेने दिले. मोबाइल कंपन्यांच्या सेवेमुळे ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीसह ऑनलाईन कामे शेतकऱ्यांवर लादू नये, असे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे म्हणाले.
घेराव आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभापचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील दुधाट , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे, ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, हभप सुरेश मानकर, माजी तालुकाप्रमुख अशोक गिते यांनी पीक विम्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. किशोर काळमेघ, देविदास ढोक, संजय हिंगे, बाबूराव साबळे, ओमप्रकाश मुरतकर, अच्युतराव गोबरे, विलास धुमाळे, जगदीश पोटे, वामनराव पवार, प्रभाकर अण्णा गावनेर, भाऊराव साबळे, भास्करराव मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, गणेश चिंचोळकर, हरिभाऊ गोळे, अरुण गोंडचोर, शरद बहादुरे, नितीन खडसे, मधुकर मोरे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित गोबरे यांनी परिश्रम घेतले.