लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : योग्य व्यवस्थापन, शासन योजनांचा लाभ, बाजारपेठेत वाढती मागणी व मिळणारा चांगला भावामुळे रेशीम शेती फायद्याची ठरत आहे. मनरेगा अंतर्गत ४.१८ लाखांचे अनुदानही मिळत आहे. शिवाय हमखास उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढला आहे.
रेशीम शेती हा एक उत्तम जोडधंदा आहे व अल्प कालावधीचे पीक असल्याने दुसऱ्या वर्षापासून वर्षाला पाच पिके घेता येतात. तुतीच्या लागवडीनंतर १५ वर्षापर्यंत पुन्हा लागवड करण्याची गरज भासत नाही. या शेतीत ६० टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग असल्याने रोजगार निर्मितीही होत आहे.
रेशीम शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना कळावे, यासाठी ९ फेब्रुवारी दरम्यान महारेशीम अभियान जिल्ह्यात राबविण्यात येते. तुती रेशीम उद्योग, रेशीमशेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करता यावी, यासाठी रेशीमरथ जनजागृती करीत असल्याची माहिती जिल्हा रेशीम अधिकारी दीपाली नागोलकर यांनी दिली.
ही पात्रता अन् कागदपत्रे आवश्यक लाभार्थी हा अल्पभूधारक, अनु. जाती- जमातीमधील असावा, आठमाही सिंचनाची सुविधा असलेली बागायती, स्वतःची जमीन असावी. ग्रा.पं.चा मनरेगा आराखडा, ग्रामसभेचा ठराव, लाभार्थी जॉब कार्डधारक व मजूर म्हणून काम करणारा, तसेच सातबारा, ८ अ, जॉब कार्ड, आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स व २ फोटो आवश्यक आहे
एका एकरात दीड लाखाचे उत्पन्न तुती लागवडीपासून पहिल्या वर्षी ५०० अंडीपुंजातून २५० किलोचे उत्पन्न होते. यामध्ये दोन पिके घेता येतात व दुसऱ्या वर्षी चार पिके व ५०० किलो कोष उत्पादन करता येते. दुसऱ्या वर्षापासून ५०० ते ६०० किलो कोषचे म्हणजे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते. ४० ते ५० हजारांचा खर्च येतो, म्हणजे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते.