अमरावती : एकीकडे ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ असे दिवास्वप्न नागरिकांना दाखविले जाते. दुसरीकडे नऊ लाख लोकसंख्येच्या महानगरात सेप्टिक टँक सफाईकरिता एकच वाहन असल्याने नागरिकांना शुल्क भरल्यानंतरही १५ ते २० दिवसांपर्यंत वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या महत्त्वाच्या समस्येकडे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष चालविल्याचे वास्तव आहे.
शासन-प्रशासनाने घरोघरी शौचालय निर्मितीची उद्दिष्टपूर्ती केली. त्यामुळे अमरावती महानगरात ६० ते ७० टक्के नागरिकांच्या घरी शौचालये आहेत. काही नागरिकांकडे २० ते २५ वर्षांपूर्वीचे शौचालये अस्तितिवात आहेत. विशेषत: अंबागेट, जवाहरगेट आतील भागातील नागरिकांकडील या शौचालयांचे सेप्टिक टँक सफाई करण्यासाठी अलीकडे धावाधाव सुरू झाली आहे. परंतु, महापालिकेच्या अधिनस्थ स्वच्छता विभागाकडे सेप्टिक टँक सफाईसाठी एकच वाहन असल्याने एक हजार रुपये शु्ल्क भरल्यानंतरही महिनाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमानुसार, शुल्क अदा केल्यानंतर तीन दिवसांत सेप्टिक टँक सफाई आवश्यक आहे.
---------------
झोननिहाय वाहन का नाही?
महापालिका प्रशासनाचा कारभार हा पाच झोनमध्ये चालतो. या पाच झोनसाठी एकच वाहन आहे. दर तीन ते चार वर्षांनी नवे कोरे वाहन घेण्याची इच्छा बाळगणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर वाहन खरेदीसाठी पुढाकार का घेत नाही, याचे आश्चर्य आहे. झोननिहाय प्रत्येकी एक सेप्टिक टँक वाहन खरेदी करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
------------------
वाढत्या लोकसंख्येनुसार सेप्टिक टँक सफाईसाठी पुरेशा प्रमाणात वाहने हवी. कोरोना आणि इतर काही कारणांनी याकडे दुर्लक्ष झाले. येत्या काळात सेप्टिक टँक सफाई वाहनांच्या खरेदीसाठी पुढाकार घेतला जाईल.
- प्रशांत रोडे, आयुक्त. महापालिका
-------------
महानगराची लोकसंख्या बघता, सेप्टिक टँक सफाईकरिता पुरेशी वाहने अपेक्षित आहेत. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन सेप्टिक टँक सफाईकरिता नवी वाहने खरेदी करावी, असे पत्र दिले जाणार आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता, महापालिका