श्यामकांत पाण्डेय - धारणीमेळघाट व्याघ्र प्रकल्पाला राज्यात प्रथम दर्जा प्राप्त झाला असला तरी येथील व्याघ्र प्रकल्पातील परिक्षेत्र अधिकारी जंगल संरक्षणाच्या बाबतीत किती दक्ष आहे याचा प्रत्यय चौराकुंड गावाजवळील भंवर नदीची पाहणी केल्यावर दिसून आला. भंवर नदी ही सिपना व गुगामल वन्यजीव विभागाला विभागणारी सीमा आहे. या नदीच्या अस्तित्वाला सध्या अवैध खणनामुळे धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे अवैध उत्खननाच्या आधारे वन्यप्राण्यांच्या संरक्षणावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.चौराकुंड हे गाव हरिसाल व्याघ्र परिक्षेत्रात येते. धारणीवरून चौराकुंडचे अंतर ३५ कि.मी. आहे. या गावाच्या उत्तरेला लागूनच पूर्व-पश्चिम वाहणारी भंवर नदी आहे. या नदीच्या पात्रात रेती व दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सध्या चौराकुंड व मालुर (वन) येथे शेकडो घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. गावात हजारो ब्रास रेती व दगडाची आवश्यकता होती. गावकऱ्यांनी रेती व दगड याच भंवर नदीच्या पात्रातून खणन करुन नेले आहे. याकडे चौराकुंड व्याघ्र प्रकल्प अधिकारी ज्यांचे मुख्यालयच चौराकुंड गावात आहे त्यांचे प्रचंड दुर्लक्षच कारणीभूत आहे. हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद गेल्या आठ महिन्यापासून रिक्त आहे. सध्या शिकाऊ वर्तुळ अधिकारी यांचेकडे या परिक्षेत्राचा प्रभार सोपविण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांचा अधिकतर कालावधी संगणकावर काम करण्यातच जात असल्याने त्यांनी आतापर्यंत पूर्ण परिक्षेत्राची पाहणी सुद्धा केली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यांच्या दौऱ्याअभावी कर्मचाऱ्यांवर कोणताच प्रभाव नसल्याने जंगल भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकारीच गावात भटकत नसल्यामुळे गावकऱ्यांनी जंगल ही स्वत:ची संपत्ती समजून वाट्टेल तेथून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूलाला चूना लागत आहे. अधिकाऱ्यांनी गौण खनिज तस्करांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
सिपना, गुगामल वन्यजीव परिसरात अवैध खणन
By admin | Published: January 27, 2015 11:24 PM