प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी मिळाली. मग काय सामािजक बदनामीच्या भीतीपोटी ‘सेक्सटॉर्शन’पूर्वी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याला बदनामीच्या भीतीने ग्रासले होते. सर, मला वाचवा, म्हणत तो अक्षरश: ढसाढसा धायमोकलून रडला. शहरातील एक उच्चशिक्षित असा तिशीच्या आतबाहेरचा एक युवक शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात पोहोचला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांच्याकडे तो व्यक्त झाला. मात्र त्याचे रडणे थांबेना. तो का रडतो आहे, हे पाहण्यासाठी कर्मचारी देखील जमा झाले. अखेर त्या सेक्सटॉर्शनच्या प्रकारातून बाहेर पडण्याचा मार्ग व समुपदेशन केल्यानंतर तो शांत झाला. याबाबत तक्रार दाखल करून घेण्यात आली.
न्युड कॉल्सच्या माध्यमातून फसवणूक - फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. चित्रपट कलावांतापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणूक अर्थात सेक्सटार्शन करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याच धर्तीवरील हा प्रकार शहरात उघड झाला. त्यात सेक्सटार्शन होण्याच्या भीतीपोटी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले.- एखादी व्यक्ती एखाद्या पॉर्न साइट, डेटिंग साइट किंवा सुरक्षित नसलेल्या साइटला भेट देत असल्यास, हॅकर्स सॉफ्टवेअरद्वारे आपल्या सर्फिंग तपशीलांचा बॅकअप तयार करतात. यानंतर त्यांना त्या साइटवर भेट देणाऱ्या व्यक्तीचा नंबर, ईमेल आयडी आणि सोशल मीडिया अकाउंट सापडतो.
सेक्सटॉर्शन गेम‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे व्यक्तीचा वैयक्तिक डेटा चोरून ब्लॅकमेल करणे आणि खंडणी मागणे. सुंदर मुलीच्या नावाने सोशल मीडियाचे फेक प्रोफाइल तयार केले जाते. फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते किंंवा व्हाट्सॲपवर ‘मॅसेज पाठवला जातो. जेव्हा समोरची व्यक्ती ते प्रोफाइल पाहिल्यानंतर विनंती स्वीकारते. आणि काही दिवसात ते नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ एक्सचेंज करतात. ते या सर्व चॅट्स आणि व्हिडिओ सामग्रीची नोंद ठेवली जाते आणि नंतर त्याच्या मदतीने ब्लॅकमेल केले जाते.