पोलीस सूत्रांनुसार, दर्यापूर तालुक्यातील पेढी गावातील रहिवासी पवन बाळू चव्हाण (१९) व स्वाती बाळू चव्हाण (१३) भाऊ-बहीण थिलोरी येथील मावशीच्या घरी चार दिवसांपूर्वी राहावयास गेले होते. ४ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता दोघांनाही झोपेत विषारी सापाने चावा घेतला. हे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना दर्यापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले. तेथे दोन-तीन तास उपचार केल्यावर दोघांचीही प्रकृती अतिशय खालावली. पुढील उपचाराकरिता त्यांना रविवारी सकाळी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आणताना सकाळी ८ च्या सुमारास रस्त्यातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. दवाखान्यात दर्यापूर तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांचेही दुपारी ३ वाजता पोस्टमार्टम करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावात बहीण-भावाचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:16 AM