धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी आपल्या धुऱ्याला रात्रीला आग लावतात आणि निवांत घरी जातात. आग रस्त्यावर असलेल्या महाकाय वृक्षांपर्यंत पोहोचून ती अर्धवट जळतात. दुसऱ्या दिवशी व्यापारी येऊन या कोसळलेल्या झाडाची परस्पर विक्री करतात. गत पाच वर्षांत तालुक्यातील महामार्ग व अंतर्गत रस्त्याच्या हद्दीतील दीड हजार महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
धामणगाव तालुक्यात अंजनसिंगी, देवगाव, मंगरुळ दस्तगीर, निंबोली, तळणी, भातकुली रस्ता प्रजिमा-३६ तसेच भिल्ली मार्गे निंभोरा ,वकनाथ पुलगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, तिवरा, चांदुर रेल्वे असे सार्वजनिक बांधकाम ,जिल्हा परिषद रस्त्यालगत निंब, वड, चिंच अशा विविध प्रजातीचे हजारो महाकाय वृक्ष आहेत. मागील पाच वर्षांत शेताचे धुरे जाळणारे शेतकरीच या झाडांच्या जिवावर उठले आहेत.
----------------------------
व्यापारी घेतात फायदा
उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत हंगामपूर्व मशागतीसाठी शेतकरी धुरे साफ करतात. शेतातील काडी कचरा एकत्र केला जातो, तर धुरे दिवसा वा रात्री पेटवण्यात येतात. ही आग रस्त्यालगतच्या झाडांपर्यंत पोहोचते. हे झाडे अर्धवट पेटल्यानंतर पहाटे झाडे कटाई करणारे व्यापारी आग टॅंकरच्या पाण्याने विझवितात. दुसऱ्या रात्री झाडांची कटाई करून विक्री केली जाते. यात ना तालुका प्रशासनाची परवानगी, ना संबंधित विभागाचा ना-हरकत दाखला घेतला जातो. वडिलोपार्जित आंब्याच्या झाडांची तर खुलेआम कटाई केली जात असल्याचे पाहायला मिळते.
------------------------
प्रशासन हतबल, जबाबदारी स्वीकारणार कोण?
वृक्ष कटाईसाठी महसूल विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रकियेला अधिक दिवस लागतात. त्यात कधी कधी तलाठीही सकारात्मक अहवाल देत नाहीत. त्यामुळे काही शेतकरी शेतातील धुरे जाळताना वृक्षाच्या बुडाशी आग लावण्याची नामी शक्कल लढवित आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता अखत्यारीत असलेले अनेक झाडे जाळली जातात. महसूल प्रशासन चौकशीत शेताच्या धुऱ्याला आग लागली म्हणून झाडे जळाली, असा अहवाल देतो.
-----------------------
कोट्यवधीचे वृक्षारोपण पाण्यात
एकीकडे शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो रोपांची लागवड करण्यात येते. परंतु, काही जण हेतुपुरस्सर वृक्षांची कत्तल करून शासनाच्या धोरणाला अडथळा निर्माण करतात. काही व्यापारी रात्रीच्या वेळी उन्मळून पडलेली झाडे अवैधरीत्या तोडून करून परस्पर विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसुल बुडतो, ही वस्तुस्थिती तालुक्याची आहे.
----------------------
तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करताना शेताचा धुरा जाळायचा असल्यास स्वत: उपस्थित राहून आग नियंत्रित करावी. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांना इजा पोहचणार नाही, याची दक्षता घेणे, झाडे आगीपासून वाचविणे गरजेचे आहे.
- जी.पी. रंभाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धामणगांव रेल्वे