- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : पूर्व मेळघाट वनविभागाने वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून, अचलपूर न्यायालयातून त्यांनी १५ जानेवारीपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. यात वन चौकीदारासह खब-यालाही ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत मेमना नाल्यावर वाघ कुजून संपला होता. त्यावरील कातडीही नष्ट झाली होती. हा पट्टेदार वाघ असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच त्याचे दात, नखं आणि हाड गोळा करण्यात आले. आॅगस्ट २०१८ च्या दरम्यानची ही घटना असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. तथापि, वनाधिकारी व कर्मचा-यांना याची माहिती नव्हती. संयोगाने वाघनखं आणि दात जप्तीसंदर्भात हे आरोपी हाती लागलेत आणि मेळघाटातील आणखी एक वाघ मेल्याचे निश्चित झाले. पकडलेल्या या सहा आरोपींमध्ये दोन आरोपी मेमना येथील, दोन मरियमपूरचे, एक चिखलद-याचा, तर एक धामणगाव गढीचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे. यातील एक आरोपी वनविभागात अस्थायी पदावर राहिलेला चौकीदार, अन्य एक चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाकरिता खबरी म्हणून काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. वनकोठडी मिळविलेल्या आरोपींचा गिरगुटी प्रकरणात काही संबंध आहे का, या दृष्टीने चौकशी अधिकारी शोध घेत आहेत. आरोपींवर जागता पहारा वनकोठडीत असलेल्या आरोपींकरिता एक वनपाल आणि पाच वनरक्षकांचा समावेश असलेल्या पथकांना आठ-आठ तास तैनात केले आहे. कर्तव्यावर वनपाल, वनरक्षकांनी झोपू नये, असे निर्देशही देण्यात आले आहे. आरोपी आणि वनपाल, वनरक्षकांकरिता गाद्या आणि पांघरूणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वनपाल, वनरक्षकांच्या पथकाचा २४ तास जागता पहारा आरोपींवर ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.