अमरावती : गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याचा येवा सुरूच असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांची एकूण १८ दारे आठवडाभरात उघडण्यात आली आहेत. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरण परिसरात पर्याटकांची गर्दी उसळली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा हा मोठा प्रकल्प दोन आठवड्यापूर्वीच शंभर टक्के भरला आहे. धरणाचे १३ दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहे. २१३ घ.मी. प्रतिसेंकदने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आली अआहेत. २०.७३ घ.मी प्रतिसेंकदाने त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. बुलडाणा जिल्ह्याला गतवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु यंदा पेनटाकळी प्रकल्पात ९९.८२ टक्के पाणीसाठा झाल्याने तीन गेट १५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. ४७.८८ घ.मी प्रतिसेंकदने पाण्याचा विसर्ग होत आहे. नळगंगा प्रकल्पात ६३.८८ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा झाल्याने यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ९९.८३ टक्के, तर काटेपूर्णा प्रकल्पात ४९.३६ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ६३.८८ टक्के, तर अरुणावती प्रकल्पात फक्त १५.४८ टक्के पाणीसाठा आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.१० टक्के पाणीसाठा आहे, अशी नोंद रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने घेतली आहे.