अमरावती : २४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक २४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये तिवसा, नांदगाव व धामणगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला व सहा मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पावसाने या तालुक्यातील नदी-नाले प्रवाहीत झाले. यशिवाय नाल्याकाठच्या शेतातील पिके खरडल्या गेली व बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे.
जिल्ह्यात सर्वधिक ५८.९ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात तर नांदगाव खंडेश्वर ५२.५ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ४०.७ मिमी पावसाची नोंद झाली. नांदगाव खंडेश्वर महसूल मंडळात ७४.३ मिमी, शिवणी ७४.३, मंगरुळ ९१.८, घुईखेड ७०.३, तिवसा ९४.८, वरखेड ७१.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. याशिवाय ६० ते ६४ मिमीचे दरम्यान पाच मंडळात पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१५.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात २३५ मिमी पाऊस झालेला आहे. ही ७४ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ४१०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.चार घरांची पडझड, ८३ हेक्टरमध्ये नुकसान
२४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे चिखलदरा तालुक्यात एक व नांदगाव तालुक्यात तीन घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय नाल्यांना पूर आल्याने नांदगाव तालुक्यातील ८३ हेक्टर शेती खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.