लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात रोजगारासाठी तीन हजार ४८८ युवक- युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार ३९ जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेने नियुक्तीचे आदेशही सर्वांना दिले आहेत. त्यानुसार निवड झालेले युवक-युवती या जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या विविध विभागात रूजू झाले आहेत.
भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सहकारी, तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील पंचायत, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सामान्य प्रशासनसह पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर नियुक्ती दिल्यात
उद्योगांसाठी मनुष्यबळ निर्माण होणार जिल्ह्यातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून, उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरू राहणार असून, या योजनेमार्फत हजारो युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे
दरमहा मिळणार मानधन शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन त्या- त्या महिन्याच्या योग्य तारखेला त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे. त्यासंदर्भात कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित युवक-युवतींना विद्यावेतन दिले जात आहे.
"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेने ३०३९ जणांना नियुक्ती आदेश दिले आहेत. नियुक्ती आदेश दिलेले सर्वच्या सर्व उमेदवार रुजू झाले आहेत. यामध्ये विविध विभागात या उमेदवारांना सहा महिन्यांसाठी नियुक्ती दिली आहे."- संजीता महापात्र, सीईओ, जिल्हा परिषद
जि.प. विभागनिहाय नियुक्त प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषद स्तर ४५६-१७१ पशुसंवर्धन १००-९७ आरोग्य विभाग ५११-५११ पंचायत विभाग ग्रा.पं. ८४१-७८८शिक्षण विभाग १५८०-१४७२