पहिलीच घटना, चिमुकल्यांना होतोय कोरोनाचा डंख, पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे
अमरावती : कोरोना संसर्गाचे भयंकर रूप आता बाहेर येत आहे. चिमुकल्यांना होणारा कोरोनाचा डंख जीवघेणा ठरत असल्याचे मंगळवारच्या घटनेवरून समोर आले. सहा महिन्यांच्या चिमुकलीचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील ती सहा महिन्यांची चिमुकली आहे. आजारी असल्याने तिच्या पालकांनी चांदूर रेल्वे येथील डॉक्टरकडे उपचारार्थ नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्यांनुसार अमरावती येतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व या चिमुकलीला मेंदूज्वरासोबत कोरोना पॉझिटिव्हचे निदान करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालिकेला सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. येथे तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र, या ठिकाणी पेडियाट्रिक डॉक्टर व आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे चिमुकलीला डॉ. सोहेल बारी यांच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
तेथे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच झटके देखील येत होते, असे डॉक्टर बारी यांनी सांगितले. २४ तासांच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे बारी म्हणाले. दरम्यान मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात चिमुकलीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
चिमुकल्यांमध्ये आढळतात ही लक्षणे
बालरोगतज्ज्ञ अद्वैय पानट यांच्या माहितीनुसार, चिमुकल्यांना प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, पातळ संडास आदी कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत. ही बालके काही सांगू शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किंबहुना या एका महिन्याच्या काळात बालकांना घराबाहेर काढूच नये, त्यांना जवळ घ्यायचे झाल्यास पहिले हात सॅनिटाईज करून घ्यावे व घरातील वृद्ध आजी-आजोबा यांच्याजवळ बालकांना देऊन नका. या बालकांमुळे त्यांना संसर्ग झाल्याची उदाहरणे त्यांनी सांगितले.
कोट
या चिमुकलीला मेंदूज्वर होता, तिला वारंवार झटके येत होते. यासोबतच कोरोनाचा संसर्गदेखील होता. आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ एक दिवसच होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
- डॉ सोहेल बारी,
बेस्ट हॉस्पिटल
कोट
या चिमुलीला सुपर स्पेशालिटीमधून येथे पाठविण्यात आले होते. तिला मेंदूज्वर होता व ती खूप वीक होती. त्यात कोरोनाचा संसर्गही होता. या दोन्ही आजारांनी तिचा मृत्यू झाला.
- अद्वैत पानट,
बालरोगतज्ञ