यशोमती ठाकूर आक्रमक : मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव आराखड्यांचा आढावा अमरावती : मोझरी विकास आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील सर्वच तीर्थस्थळांची कामे सहा महिन्यांत पूर्ण करा, अन्यथा उपोषण करणार, असा इशारा तिवस्याच्या आ. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिला. यावेळीे एकच खळबळ उडाली. दरम्यान विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी प्रशासनाची बाजू सावरत आक्रमक झालेल्या आमदार यशोमती ठाकुरांना शांत केले. तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे श्रीक्षेत्र मोझरी, विठ्ठल-रुक्मीणी देवस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर आणि अमरावती तालुक्यातील संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगाव या तीन तीर्थस्थळांच्या विकास आराखड्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यकारीणी समितीची बैठक पार पडली. यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी रखडलेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले. बैठकीला विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जर्नादन बोथे आदी उपस्थित होते. यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी तीर्थक्षेत्राच्या विकासात राजकारण होत असल्याचा आरोप केला. कंत्राटदार, एजन्सींना शासनाकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. सन २०१३ चा विकास आराखड्याला २०१७ हे वर्ष बघावे लागत आहे, ही नामुष्की कोणी आणली? याचे चिंतन करण्याचा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिला. मोठ्या कष्टाने आणलेल्या मोझरी विकास आराखड्यातील विकास कामे पूर्ण सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले नाही तर शासन- प्रशासनाविरुद्ध उपोषण केले जाईल, असा सज्जड इशारा आ. यशोमती ठाकूर यांनी दिला. तीर्थस्थळाच्या विकासाबाबत दोन वर्षांनंतर समितीची बैठक आयोजित करण्याबाबतही त्यांनी शल्य व्यक्त केले. प्रशासनाकडून जुजबी कारणास्तव तीर्थस्थळांची कामे रोखली जात आहेत. नेमके कोणाच्या आदेशाने हा प्रकार सुरु आहे? हे तरी प्रशासनाने स्पष्ट करावे, हा मुद्दा आ. ठाकुरांनी उपस्थित केला. केवळ तिवसा मतदार संघात तीर्थस्थळाची कामे असल्यानेच अडवणुकीचे धोरण प्रशासन घेत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा दम त्यांनी भरला.
तीर्थस्थळांच्या विकासासाठी सहा महिन्यांचा ‘अल्टिमेटम’
By admin | Published: April 22, 2017 12:15 AM