मोहन राऊत ।धामणगाव रेल्वे : निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.अमृत रेड्डी यांनी आॅरगॅनिक खत, आॅरगॅनिक तणनाशक, आॅरगॅनिक प्लांट ग्रोथ प्रोमोटर, आॅरगॅनिक फ्लॉवर स्टिम्यूलंट, आॅरगॅनिक माक्रोन्यूट्रिएंट आणि आॅरगॅनिक अमिनो असिड असे सहा संशोधन केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील खत तपासणी व संशोधन केंद्राने त्यांच्या आॅरगॅनिक खताचे नमुने तपासले. त्यामध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात असल्याचा निष्कर्ष दिला. त्यांनी याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सावळा (ता. धामणगाव रेल्वे) येथील अमरावती विलास मेटे यांच्या शेतात गवारावर केला असता, त्यांना एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. धामणदरी (ता. घाटंजी) येथील भोजा रेड्डी यांच्या तिळाच्या शेतात आणि सावंगी (ता. घाटंजी) येथील सुनील रेड्डी यांच्या मुगाच्या पिकातही चांगले परिणाम मिळाले.सध्या छत्तीसगढ येतील शेतकरी मनोहर साहू यांच्या शेतात कारले, दोडका, काकडी, वाल तसेच वांगे या पिकांवर प्रयोग सुरू आहे. अमृत रेड्डी यांनी कापूस, तूर, टरबुज, हरभरा, मिरची, कांदा या पिकावर प्रयोग यशस्वी केले. ही पिके काढणीपश्चात नागपूर येथील केंद्रातून तपासली असता, त्यामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. या संशोधनामुळे इंग्लंड येथील विद्यापीठातून त्यांना पीएचडीसाठी पाचारण करण्यात आले.अमृत गड्डमवार यांच्या आॅरगॅनिक खतनिर्मिती प्रयोगावरदेखील नामांकित प्रयोगशाळेची मोहोर लागली आहे.शेतीतील खर्चाला फाटाशेतातील लागवडीचा खर्च वाढला आहे. लहरी हवामान आणि रासायनिक खताच्या चढ्या किमतीमुळे शेती करणे कठीण होत आहे. उत्पादन कमी व उत्पादनमूल्य जास्त अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकून आहे. वरील समस्या सोडविता येत असल्याचा दावा अमृत गड्डमवार यांनी केला आहे. आपल्याला या यशस्वी प्रयोगाची प्रेरणा व मार्गदर्शन कारंजा लाड येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. राजपूत यांच्याकडून मिळाले असल्याचे गड्डमवार यांनी सांगितले. अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बेलसरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. धमांदे यांनी त्यांचे कौतुक केले. अमृत रेड्डी यांनी प्रयोगांची देशपातळीवरील प्रयोगशाळांमध्ये पडताळणी केली आहे. त्यांच्या संशोधक वृत्तीची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांचे नाव या पुस्तकात नोंदविले गेले आहे.
शेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:39 AM
निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । धामणगावच्या प्राध्यापकाची धडाडी, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित