अमरावती : अमरावती-दर्यापूर मार्गाने वर्धाकडे निघालेल्या आकोट आगाराच्या बसमधील चालकाला डोळ्यांपुढे अचानक अंधारी आल्याने नियंत्रण सुटले. करकचून ब्रेक दाबल्याने रस्त्याच्या कडेला बस थांबली. या घटनेत बसमधील १५ पैकी ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.
खोलापूरनजीक महावितरणच्या वीज केंद्रापुढे हा अपघात घडला. रामेश्वर एगळे (५५, रा. शिंगणापूर), शकुंतला एगळे, हिंंमतराव धाडे (रा. उमरा, ता. आकोट), सहदेव मेश्राम (७१, रा. अमरावती), बेबीबाई थोरात (रा. जळका हिरापूर), संतोष इंगळे (३६, रा. बडनेरा) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच खोलापूर ठाण्याचे ठाणेदार आपल्या पोलीस व घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. बसमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना ठाणेदारांनी पोलीस व्हॅनमध्ये बसून खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले. तेथून प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, गजानन वानखडे असे किरकोळ जखमी झालेल्या बसचालकाचे नाव आहे. त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर बस घटनास्थळी उभी असल्याचे खोलापूर पोलिसांनी सांगितले.