चिखलदरा (अमरावती) : मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी 10 वाजता सेमाडोह ते माखला मार्गावर मोठ्या दगडासह दरड कोसळल्याने सहा गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळताना वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गावरील माखला, खडीमल, चुनखडी, बिच्छुखेडा, नवलगाव, माडिझडप या सहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिसरात सतत रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठे पहाड खचून रस्त्यावर येत असल्याने मेळघाटातील रस्ते जीवघेणे झाले आहेत.
रविवारी माखला मार्गावर दरडीसोबत मोठे वृक्षही उन्मळून रस्त्यावर पडले आहेत. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यासंदर्भात संबंधित विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे जि.प. सदस्य सुनंदा काकड यांनी सांगितले. परंतु, रस्त्यावरील पडलेले मोठे वृक्ष, दगड व दरड उचलण्यासाठी रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत कुठल्याच प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
मोठा अनर्थ टळला
सहा गावांसाठी हा मार्ग एकमेव असल्याने दुचाकी, रुग्णवाहिका व इतर प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. सतत रिमझिम पाऊस सुरू असल्याने रविवारी या मार्गावर वाहतूक थंडावलेलीच होती. त्यामुळे दरड कोसळतेवेळी रस्त्यावर कुणीही नव्हते. काहीवेळाने सेमाडोह, परतवाडा, चिखलदरा, धारणी तालुका मुख्यालय व अन्य गावांकडे जाणाºयांनी जीवघेणी कसरत करीत स्वत:च माती व दगड हटवून पुढचा प्रवास केला.