अमरावती : अनलिमिटेड ह्युमन रेस म्हणून ओळख असलेल्या, जगातील सर्वांत जुन्या कॉम्रेड मॅरेथाॅनमध्ये विहित मुदतीत दिलेले अंतर पार करून अमरावतीच्या सहा धावपटूंनी चमकदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या मॅरेथॉन बोर्डद्वारा या वर्षी ९७ वी कॉम्रेड मॅरेथाॅन ९ जून रोजी डर्बन येथे पार पडली. या स्पर्धेत जगभरातील २० हजारांपेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले होते. भारतातूनही ३६६ धावकांनी कॉम्रेड स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ३३६ पुरुष, तर ३० महिलांचा सहभाग होता. महाराष्ट्रातून २२ महिला सहभागी झाल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेतील वेळेनुसार सकाळी ५:३० व भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ती गन टाइमनुसार सुरू होते व बरोबर १२ तासांनंतर संपते. त्या वेळेनंतर कुणीही फिनिश लाइन क्रॉस करू शकत नाही, हे विशेष. या स्पर्धेत अमरावती मॅरेथॉनचे सर्वेसर्वा व रेस प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी नवव्यांदा सहभागी होत ही रेस ११ तास २५ मिनिटांनी पूर्ण केली. पोलिस कर्मचारी राजेश कोचे यांनी ९ तास ५० मिनिटांत, पोलिस निरीक्षक सतीश उमरे यांनी १० तास ५९ मिनिटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील यांनी ११ तास ३८ मिनिटे, पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी ११ तास ५३ मिनिटे, तर म्हाडा येथील उपअभियंता दीपमाला साळुंखे ( बद्रे) यांनी ११ तास ४९ मिनिटांमध्ये ९० कि.मी. अंतर पार केले. दीपमाला यांनी सलग दुसऱ्यांदा ही मॅरेथॉन पूर्ण केली असून, सलग दोन वर्षे कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या विदर्भातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.