अमरावती : कंझर्व्हेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स (सीए/टीएस) या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने वाघांच्या संवर्धनासाठी मेळघाटसह देशभरातील सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही उपलब्धी सन्मानजनक मानली जात आहे.
सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र), पेरियार राष्ट्रीय उद्यान (केरळ), काली टायगर रिझर्व्ह (कर्नाटक), पिलीभीत व्याघ्र प्रकल्प (उत्तरप्रदेश), ताडोबा-अंधारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) समावेश आहे. सीए/ टीएस या संस्थेने वाघांचे संरक्षण, अधिवासात वाढ आणि पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतल्यामुळेच येथे व्याघ्र संख्या वाढल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. स्वित्झरलॅंड येथील सीए/ टीएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने वाघांच्या संरक्षणाबाबत सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केल्याबाबतचे पत्र केंद्रीय वने, पर्यावरण मंत्रालयाने २४ मार्च २०२३ रोजी जारी केले आहे. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व्हावे, संख्या वाढावी आणि पर्यावरण संतुलित राहावे, यासाठी कार्यरत सीए/ टीएस या जागतिक दर्जाच्या मान्यताप्राप्त संस्थेने मेळघाटसह देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाचा समावेश केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षाकडे वाटचाल सुरू झाली असून, त्याचा समावेश होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विशेषत: या व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निमंत्रण दिले आहे. - नवनीत राणा, खासदार, अमरावती
मेळघाटची जागतिक स्तरावर भरारी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहे. आता सुवर्ण महोत्सवी वर्षात मेळघाट व्याघ्र प्रकल्पास वाघांचे संरक्षण, संवर्धानासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता प्राप्त होणे म्हणजे मेळघाटने जागतिक स्तरावर भरारी घेतल्याचे मानले जात आहे. या उपलब्धीबाबत खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारने आभार मानले आहे.