गोवंश हत्याबंदीचा परिणाम : बेलोरा येथील बाजारपेठेत शुुकशुुकाटअमरावती : शासनाने गोेवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे कातडी व्यवसायावर अवकळा आली आहे. विदर्भात सर्वात मोठी कातड्याची बाजारपेठ असलेल्या बेलोरा (विमानतळ) येथे शुकशुकाट पसरला आहे. कातडे व्यावसायिक हतबल झाले असून ते पर्यायी व्यवसायाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.गोवंश हत्याबंदी कायदा लागू होण्यापूर्वी कातडी व्यवसाय भरभराटीवर होता. मात्र, राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरु होताच पशुची कटाई कमी झाली आहे. बैल, रेडा आदींवर अंकुश लागल्याने कातडी व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कातडी व्यवसायाचे प्रमुख केंद्र हे कोलकाता असून पशुंची कत्तली थांबल्याने अनेक व्यावसायिकांनी राज्याकडे पाठ फिरवली आहे. कातडी व्यवसायाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी पर्यायी व्यवसायाची शोधमोहीम सुरु केली आहे. बेलोरा येथील कातड्याच्या बाजारपेठेत दर रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना कातडे विक्रीकरिता येणे बंद झाले आहे. दुसरीकडे कुरेशी समाजाने कायदा सर्वश्रेष्ठ माणून मांसविक्री बंद केल्यामुळे पशुंची कत्तल थांबविली आहे. या सर्व बाबींमुळे कातडी व्यवसायावर अवकळा आल्याचे सध्याच्या बाजारपेठेतील स्थितीवरून दिसून येत आहे. हल्ली शेळी, मेंढी यांच्याच कातड्याची विक्री होत असून या कातड्यांना कमी प्रमाणात मागणी असल्याने खरेदीदार फिरकत नसल्याचे दिसून येते. हा प्रकार राज्यभरात सुरु असून आता पशुंच्या कत्तली करुन मांस विक्री करता येणे ही बाब अशक्य झाली आहे. (प्रतिनिधी)गोहत्या बंदी असलीच पाहिजे. मात्र, ज्या समूहाचा परंपरागत व्यवसाय हा कातडी, मांस विकणे आहे त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे संयुक्तिक नाही. काही समूहाचे खाद्यदेखील मांस असून नवीन गोवंश हत्याबंदी कायद्याने त्यांच्यावर गंडांतर आले आहे. - सलीम कुरेशी, कातडी व्यावसायिक, बडनेरा.हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गाय, बैलाचे मांस खाण्यापेक्षा मांसाहार करणाऱ्यांनी शासन पुरस्कृत कोंबडी, शेळी, मेंढीचे मांस खाऊन उपजिविका भागवावी. गोवंश हत्याबंदी कायद्याने गाय, बैल, रेडा आदी पशुंना संरक्षण दिले आहे.- अरुण मोंढे, शहराध्यक्ष, विहिंप.
कातडी व्यवसायावर अवकळा
By admin | Published: April 05, 2015 12:24 AM