इंदल चव्हाण-अमरावती : जिल्ह्यात सन २०१५ मध्ये जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्राची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत ११ हजार १४ मुला-मुलींनी याद्वारा प्रशिक्षण घेतले. यातून ६ हजार २०६ मुलांनी स्वकौशल्यावर रोजगार निर्मितीतून संसाराला हातभार लावला आहे. १५ जुलै हा युवा कौशल्य विकास दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात युवकांच्या अंगी कला, कौशल्य निर्माण होऊन त्यांना भावी जीवनात स्वयंरोजगार तथा रोजगाराचे साधन निर्मिती करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. येथील जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास केंद्रात आतापर्यंत प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण व अन्य योजनांतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य विकासाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना तयार करण्यात आले आहे. ६२०६ मुलांनी या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोविड-१९ मुळे सध्या प्रशिक्षण बंद असले तरी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात ८ जुलै रोजी मुंबई येथे करण्यात आली. यामध्ये राज्यात २० हजार प्रशिक्षणार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याकरिता या मुलांचे प्रशिक्षण सार्थक लागावे, या अपेक्षेने हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून ६०० मुलांना आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्य गुणांवर आधारित प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार चार बॅचेस सद्यस्थितीत तयार करण्यात आले आहेत. त्यांना रेडीएंट हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय व अन्य एका ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये आकस्मिक वैद्यकीय उपचार पद्धती, ड्रेसर्स जनरल कोर्स असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, होम हेल्थ एज ड्युटी मॅनेजर या सारखे कोर्सेसचे प्रशिक्षण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिले जात आहे.
प्रशिक्षणाचे निकस
कौशल्य विकास प्रशिक्षण दोन विभागांतर्गत दिले जाते. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आणि जनरल कौशल्य विकास प्रशिक्षण योजना असे दोन भाग आहेत. जनरलमध्ये दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांतर्गत इयत्ता ८ पासून वयाच्या ४५ वर्षांपर्यंतची व्यक्ती हे प्रशिक्षण घेण्यास पात्र आहेत.
कोट
१५ जुलैला जातकिक युवा कौशल्य प्रशिक्षण दिन आहे. येथून सहा वर्षांत ११०१४ मुलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ६२०६ मुलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. या दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.
- प्रफुल्ल शेळके, युवा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास केंद्र, अमरावती