अमरावती : जगातील तिसरा आणि देशातील पहिला चिखलदरा येथील स्काय वॉक लवकरच पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून केंद्र सरकारकडे आवश्यक कागदपत्रांचा पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावणार, असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील नवीन सचिवालयात मंगळवारी स्काय वॉकसंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत खा. नवनीत राणा बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्रीय वनविभाग, पर्यावरण विभाग, सिडको अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पांच्या सर्व तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. स्काय वॉक पूर्णत्वास जाण्यासाठी त्रुटी दूर करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दोन महिन्यांच्या आत रखडलेली कामे मार्गी लावण्याचे निर्देश खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य शासनाचा हलगर्जीपणा, उदासीनता या विषयात पुढे आली असून, त्यांनी कोणताही प्रोजेक्ट रिपोर्ट दिला नाही तसेच या प्रकल्पाच्या परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे न दिल्याने स्काय वॉकचे काम रखडले, असा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारचे डीडीजीएफ व्ही.एन. अंबाडे, राज्य शासनाचे नोडल अधिकारी नरेश झुरमुरे, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक युवराज, केंद्र शासनाचे तांत्रिक अधिकारी एन.के. डेमरी, मेळघाटच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, सिडकोचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जामनेकर, सहअभियंता अमोल निमसळकर, केंद्र सरकारचे एआयजी सी.बी. तहसीलदार आदी वरिष्ठ अधिकारी, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, सुधा तिवारी, जयंतराव वानखडे, पवन हिंगणे, खूष उपाध्याय, सचिन सोनोने आदी उपस्थित होते.
---------------
कोट
मेळघाटच्या विकासात राजकारण नको. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील हा प्रकल्प आहे, मात्र, विद्यमान आघाडी शासन यात हस्तक्षेप करीत असल्याने हा ड्रीम प्रोजेक्ट कसा रखडणार, याचे नियोजन करीत आहे. मात्र, आता स्वत: लक्ष देऊन यातील तांत्रिक त्रुटी पूर्ण करणार आहे,
- नवनीत राणा, खासदार.
---------------