-----------------------------------------------------------------------------------------------
चिखलदरा येथील देशातील पहिला प्रकल्प, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काढल्या तीन उणिवा, सिडको समिती नेमणार
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती)
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील देशातील पहिल्या स्काय वॉकसंदर्भात तीन छोट्या त्रुटी काढल्या आहेत. त्या पूर्ण करताच या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तो पूर्णत्वास जाईल, असे जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात त्यांनी नागपूर येथे संबंधित व्याघ्र प्रकल्प, सिडको व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता त्रुटी दूर करून पुन:प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
चिखलदरा पर्यटन विकास आराखड्याची अधिसूचना २००८ मध्ये प्रकाशित झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने २०१८ मध्ये कोट्यवधी रुपयांचा चिखलदरा विकास आराखडा मंजूर केला. या विकासकामांची जबाबदारी सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशन (सिडको) कडे सोपविली. त्यामध्ये चिखलदऱ्यातील हरिकेन पॉईंट ते गोराघाट दरम्यान आशिया खंडातील सर्वाधिक ४०७ मीटर लांबीच्या स्कॉयवॉकचा समावेश आहे.
स्वित्झर्लंड येथील स्कायवॉक ३९७, तर चिनमधील स्कायवॉक ३६०मीटर लांबीचा असल्याने चिखलदऱ्याचा स्कायवॉक हा आशिया खंडातील सर्वात मोठा व भारतातील पहिला स्कायवॉक ठरणार आहे.
बॉक्स
पाचशे पर्यटकाचा भार सांभाळण्याची क्षमता
स्कॅय वॉकची उंची २८० मीटर (अंदाचे ५९४ फूट) आहे. या स्कॉय वॉकचे फ्लोअर १२ मिलीमीटर जाडीच्या त्रिस्तरीय काचेचे असणार आहे. एकाचवेळी ५०० पर्यटकांचा भार सांभाळण्याची तसेच प्रतितास १९० किलोमीटर गतीचा वारा झेलण्याची क्षमता या काचेची राहणार आहे. हरिकेन आणि गोराघाट यादरम्यान सर्वसाधारण वाऱ्याचा वेग ताशी १६० किलोमीटर असतो. या प्रकल्पावर सुमारे 40 कोटी रुपये खर्च होत आहेत. इंदूर येथील अॅपिकॉन कंस्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या स्काय वॉकच्या ४० मीटर उंचीच्या पिलरच्या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात होऊन प्रकल्प फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र, सिडकोने आवश्यक त्या परवानग्या न घेताच काम सुरू केल्यामुळे परवानगीच्या फेऱ्यात हा महत्त्वपूर्ण प्रकल्प अडकला आहे.
box
या आहेत त्या तीन त्रुटी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्काय वॉकसंदर्भात पाठवलेल्या पत्रात तीन त्रुटी काढल्या. त्या आधारावर परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार
१ नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे अप्रूव्हल घ्या.
२ पर्यावरणावर स्काय वॉक केल्यावर त्याचा परिणाम काय होईल, त्याचे सादरीकरण करा.
३ वन्य प्राण्यांवर त्याचा काही परिणाम होणार का?
अशा या तीन त्रुटींबाबत सिडकोला पत्र पाठविण्यात आले आहे
बॉक्स
सिडकोतर्फे पर्यावरणतज्ज्ञांची नियुक्ती
केंद्रीय पर्यावरण खात्याने स्काय वॉकची परवानगी नाकारल्यानंतर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सिडको आणि व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर येथे बैठक घेतली होती. केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्याने परवानगी नाकारली. त्यावर उपाय काय, याचा शोध त्यांनी घेतला. अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानुसार आता सिडकोतर्फे लवकरच पर्यावरण विशेषज्ञांची नियुक्ती करून त्रुटी निकाली काढल्या जाणार आहेत.
कोट
केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्याने तीन त्रुटींमुळे परवानगी नाकारली. पर्यावरणतज्ज्ञांची नियुक्ती करून अहवाल सादर केला जाणार आहे.
- डी.एस. जामनेकर, कार्यकारी अभियंता, सिडको, चिखलदरा
कोट
नागपूर येथे व्याघ्र प्रकल्प, सिडको व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परवानगी नाकारण्याचे कारण जाणून घेतले व राज्याच्या सिडकोने त्रुटी पूर्ण कराव्यात, अशी सूचना बैठकीत दिली. त्या पूर्ण करून लवकरच केंद्र शासनाला पुन:प्रस्ताव पाठविला जाईल व स्काय वॉक पूर्णत्वास जाणार आहे.
- नवनीत राणा, खासदार अमरावती