चिखलदरा (अमरावती) : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे स्कायवॉकला स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी मिळाली असून, लवकरच नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी मिळताच कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अचलपूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. प्रकल्पाचे काम ७२ टक्के झाले आहे. ते लवकरच पूर्ण होऊन स्कायवॉक प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून येथील स्कायवॉकचे काम व्याघ्र प्रकल्प परिसरात येत असल्याने महत्वपूर्ण असलेल्या परवानगीसंदर्भात काम थांबले होते. याबाबत आ. बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी मिळाली असून, ती अमरावती येथील व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक यांना सादर केली. तेथून संबंधित कागदपत्रे नॅशनल बोर्डकडे पाठवून लवकर ती परवानगी मिळताच काम मार्गी लागणार असल्याचे आ. कडू म्हणाले.
सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बैठक
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सिडकोचे अधिकारी आणि आ. बच्चू कडू व आ. राजकुमार पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकल्पासंबंधी सर्व अडथळे दूर झाले असून, नॅशनल वर्ल्ड बोर्डाची परवानगी मिळताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.
असा आहे स्कायवॉक
जगात स्वित्झर्लंड आणि चीन येथेच स्कायवॉक आहेत. स्वित्झर्लंड येथील स्कायवॉकची लांबी ३९७ मीटर, तर चीनमधील स्कायवॉक ३६० मीटरचा आहे. चिखलदरा येथील स्कायवॉक जगातील तिसरा असला तरी लांबी सर्वाधिक ४०७ मीटर राहणार आहे.
रखडलेल्या चिखलदरा येथील स्कायवॉक प्रकल्पाला स्टेट बोर्ड वाईल्ड लाईफची परवानगी मिळाली आहे. लवकरच केंद्राची परवानगी मिळेल आणि पर्यटकांच्या सेवेत लवकर येईल. आता औपचारिकता बाकी आहे. काम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी व सहकारी आमदार राजकुमार पटेल सतत प्रयत्नशील आहोत.
- बच्चू कडू, आमदार
७२ टक्के काम पूर्ण झाले. एका महिन्यात पूर्ण काम होईल. स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी मिळालेली कागदपत्रे व्याघ्र प्रकल्प संचालक यांच्याकडे दिली आहेत. केंद्राची परवानगी मिळताच पंधरा दिवसांत कामाला सुरुवात होईल.
- देवेंद्र जामनीकर, कार्यकारी अभियंता, सिडको