रानवैऱ्यांचा उपद्रव : महसूल विभागाचे दुर्लक्ष येवदा : दर्यापूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. वडनेरगंगाई-राजखेड मार्गावर एमआरजीएसमधून पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून तयार करण्यात आले. परंतु या मार्गावरील १९ बाभळीची आणि ५ निंबाची अपरिपक्व झाडे तोडण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महसूल विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु झाडे तोडण्यास मनाई केल्यावरसुध्दा कुणालाही विश्वासात न घेता हिरवीकंच झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकीकडे सामाजिक वनीकरण विभाग दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करीत आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना तसे आदेश देत आहे. तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसविले जात आहे. येवदा परिसरातील वडनेरगंगाई, राजखेड, येरंडगाव, उमरी, येवदा, पिंपळोद मार्गावरील झाडे कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या तोडली जात आहे. काही शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून जिवंत झाडांना जाळण्याचे कटकारस्थान रचत आहे. जिवंत झाडे जाळून मार्गावर पाडली जातात. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आजपर्यंत कारवाई केल्याचे दिसत नाही. एक झाड तयार करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा अवधी लागतो. पोटच्या मुलाप्रमाणे दररोज पाणी टाकून झाडांची जपणूक केली जाते. काही ठिकाणी नियोजनशून्य धोरणामुळे झाडे वाळतात. झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश शासन देत असले तरी रानवैऱ्यांकडून शासनाच्या उपक्रमाला तिलांजली दिली जात आहे. शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून योजना राबवीत आहे. शासनाने जर वृक्ष जिवंत ठेवण्याकडे लक्ष दिले तर पुढे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. शासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनभिज्ञवृक्षकटाईबाबत दर्यापुरचे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास साफ नकार दिला. यावरून दर्यापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना पर्यावरणाबाबत काही देणे-घेणे नाही, हे दिसून येते. तालुक्यात होत असलेली कत्तल त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे.
राजखेड-वडनेर मार्गावर २४ झाडांची कत्तल
By admin | Published: June 18, 2016 12:08 AM