अमरावती : कोंलबोत पार पडलेल्या योग संमेलनात भारत व श्रीलंकेच्या मैत्री जिंदाबादचे नारे गुंजले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने श्रीलंका सरकारच्या क्रीडा खात्याच्या सहकार्याने पहिल्यांदाच योग संमेलन व योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संमेलन समितीचे अध्यक्ष प्राचार्य अरुण खोडस्कर व सचिव रवि शाहू यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून दिली. ११ फेबु्रवारी रोजी संमेलनाच्या उद्घाटन श्रीलंकेच्या क्रीडा खात्याचे मंत्री हरिन फरनांडो यांच्या मार्गदर्शनात सचिव चुलांनादा परेसा यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचे माजी सहसंचालक योगतज्ज्ञ मुकुंद भोळे, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाचे सचिव निहाल हननायके, राष्ट्रीय क्रीडा विज्ञान संस्थेचे संचालक साजिद जयलाल, भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका राजेश्री बेहरा, जागतिक आरोग्य संघटनेच्या कोलंबो शाखेच्या संचालिका रजिया पेंडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. संमेलनात योग कार्यशाळा, योगासन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती पत्रपरिषदेतून देण्यात आली. यावेळी हव्याप्र मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, सुरेश देशपांडे, कमलकाम देवनाथ, स्मिता आदी उपस्थित होते.
कोलंबोत भारत श्रीलंका मैत्री जिंदाबादचे नारे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 8:54 PM