बडनेरा : नवीवस्तीतील मोदी दवाखान्याच्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी तुटपुंजा मंडप उभारल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावे लागत आहेत. फिजिकल डिस्टंसिंगचादेखील फज्जा उडत आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, असे बोलले जात आहे.
काही दिवस विश्रांती घेऊन लसींचा पुरवठा होत असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. त्यांच्यासाठी मोदी दवाखान्याच्या लसीकरण केंद्रावर मंडप उभारण्यात आला. मात्र, जेमतेम ५० लोक त्याखाली उभे राहिले की, जागा अपुरी पडेल, अशी स्थिती येथे आहे. सद्या उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. त्यामुळे सावलीसाठी उपाययोजना करण्याची मागणी व मंडपासंबंधी तक्रारीदेखील अनेक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे केल्या. ऊन लागू नये, यासाठी नाइलाजास्तव लसीकरण केंद्रावर आलेल्या लोकांना सावलीसाठी दाटीने उभे राहावे लागते. लसीकरण मोहीम सुरूच राहणार असल्याने किती दिवस नागरिकांनी उन्हाचा चटका सहन करायचा, असा प्रश्न याप्रकरणी विचारला जात आहे.
मोदी दवाखान्याला लागूनच ट्रामा केअर हॉस्पिटल आहे. तेथेही लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश बनसोड व ललित झंझाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ट्रामा केअरमध्ये लसीकरणासाठी आलेल्या लोकांना आतच बसण्याची तसेच पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था आहे, असे त्यांनी नमूद केले.