सुनील देशमुख : महापालिकेत बैठकअमरावती : स्मार्टसिटी प्रकल्पात अंबानगरीचा समावेश सुनिश्चित करायचा असेल तर ३० जूनपूर्वी पाठविला जाणारा फेरप्रस्ताव सर्वसमावेशकच हवा, ही शेवटची संधी आहे. अगदी सूक्ष्म अभ्यास करूनच डीपीआर पाठविण्याचे निर्देश आ.सुनील देशमुख यांनी दिले. गुरुवारी आ.देशमुख यांनी महापालिका सभागृहात बैठक घेतली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रयत्नात अमरावतीचा समावेश झाला नाही, तर ती कधीही भरून न निघणारी हानी असेल, अशी भीती व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. याशिवाय गुडेवारांच्या कार्यकाळात ज्यांना नोटीसेस देण्यात आल्यात त्यांचे पुढे काय झाले, अशी विचारणाही त्यांनी केली. २०१५-१६ मध्ये बांधलेल्या कॉम्प्लेक्सच्या पार्किंगची पाहणी करण्याचे निर्देश देताना खत्री कॉम्प्लेक्स व जवाहर गेटमधील कॉम्प्लेक्समधील प्रकरणात फौजदारी दाखल करता येणे शक्य नव्हते तर मग फार्स कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित करून उपायुक्त चंदन पाटील, एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांची कानउघाडणी केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये नेमके काय झाले ते जनसमोर येऊ द्या, असे आवाहन उपस्थित गटनेत्यांना केले. ४१२१ पैकी ज्या १६५३ फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. त्यांच्यासाठी हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू करावे, याशिवाय वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला निधी मजीप्राकडे हस्तांतरित करावा, अशा सूचना त्यांनी केल्यात. बैठकीदरम्यान उपअभियंता रवींद्र पवार यांना देशमुखांच्या संतापाला सामोरे जावे लागले. बैठकीला आयुक्त, महापौर रिना नंदा व सर्व गटनेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सर्वसमावेशक हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 12:16 AM