अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ‘रासेगाव’ अचलपूर तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’ ठरले आहे. यात गावाने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव शासनाकडून करण्यात आला आहे.आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त रासेगाव ग्रामपंचायत अंतर्गत लोक सहभागातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली. ३,५०० लोकसंख्येच्या या गावात प्लास्टिकबंदी आणि कुऱ्हाड बंदी करण्यात आली. गावाच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून वृक्ष लागवड करण्यात आली आहे.पाणीपुरवठा अंतर्गत गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा असून वर्षभरात एकदाही लाल कार्ड गावाला लागले नाही. गावच्या पाणी पुरवठ्याला हिरवे कार्ड असून नळाच्या पाण्याचाच वापर गावकरी करीत आहेत. स्वच्छता, व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानात गावाने पूर्ण पैकी पूर्ण गुण प्राप्त केले आहेत. रासेगावात गतवर्षी परिणामकारकरित्या घनकचरा व्यवस्थापन राबविल्या जात असून लोकसहभागातून ग्रामस्वच्छता ही संकल्पना गावकऱ्यांनी स्विकारली आहे. वैयक्तिक शौचालय सुविधाचा वापर शंभर टक्के असून सुकन्या समृद्धी योजनेसह केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर केल्या गेली. दशसूत्रीचे पालन करणाऱ्या गावातील बचतगटांत महिलांचा सहभाग आहे. जल संधारणाच्या कामातही गाव आघाडीवर आहे. गावाला स्मार्ट करताना गावकऱ्यांनी राळेगणसिद्धी आणि राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली. या दौऱ्यात समाजसेवक अण्णा हजारेंकडून गावविकासाची संकल्पना समजून घेतली. ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी तर विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत सबस्टेशनकडे थकीत असलेल्या २८ लाखांचा कर वसूल केला. अशाप्रकारे कल वसूल करणाऱ्या आणि गावातील डी. बी. वर कर लावणाऱ्या या पहिल्या ग्रामसेविका ठरल्यात. सरपंच अनुराधा मोरे, उपसरपंच उमेश गायगोले, सर्व ग्रा.पं. सदस्य, जि.प. व पं.स.चे आजी-माजी सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने रासेगाव ‘स्मार्ट ग्राम’ बनल्याचे ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी स्पष्ट केले. गटविकास अधिकारी जयंत बाबरे, विस्तार अधिकारी गेडाम यांचेसह पंचायत समिती स्तरावरून मिळालेले मार्गदर्शनही यात उल्लेखनीय राहले.
‘रासेगाव’ तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 9:59 PM
‘रासेगाव’ अचलपूर तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’ ठरले आहे. यात गावाने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव शासनाकडून करण्यात आला आहे.
ठळक मुद्देशासनाकडून गौरव : विविध विकासकामांच्या कार्याचा गौरव, प्लास्टिकसह कुऱ्हाडबंदी यशस्वी