अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. या ग्रामपंचायतींच्या जानेवारीत मतदान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच गटागटांची तयारी सुरू झाली आहे. या सार्वत्रिक निवडणुकांचा जिल्ह्यातील तब्बल ५५३ ग्रामपंचायतींमध्ये धुराळा उडणार आहे.
जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५५३ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. त्यांची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुका असलेल्या गावांत गावस्तरावर गटागटांची रणनीती ठरविली जात आहे. त्याकरिता गावस्तरीय नेत्यांकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निकालाचा भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावरही काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे.
बॉक्स
इच्छुक लागले कामाला
प्रभाग आरक्षण निश्चित झाल्याने संभाव्य उमेदवारांची यादी गटाकडून तयार होऊ लागली आहे. इच्छुकांनीही तयारी चालविली आहे. पक्षीय पातळीपेक्षा प्रत्यक्ष स्थानिक गटाला अधिक महत्त्व जरी असले तरी स्थानिक प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बॉक़्स
सुटीच्या दिवशीही स्वीकारणार हरकती, सूचना
माहे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मदुत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग प्रारुप मतदार यादी १ डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर हरकती व सूचना १ ते ५ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिध्द केली जाईल. मतदार यादीवरील हरकती व सूचना स्वीकारण्यासाठीच्या कालावधीत आलेल्या सुटीच्या दिवशी तहसील कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करून हरकती व सूचना स्वीकारण्यात याव्यात, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक यंत्रणेला दिले आहेत.