लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चिखलदरा स्थानिक नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या चंदन बनातील जवळपास पंधरा मौल्यवान चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. वृत्त लिहिस्तोवर सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.
चिखलदरा नगरपालिका अंतर्गत असलेल्या चोर बगीचा हनुमान मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून मौल्यवान चंदनाची झाडे असलेले बन आहे. किमान तीनशेपेक्षा अधिक चंदनाची झाडे या परिसरात आहेत. नगर परिषदेच्यावतीने सहा वर्षांपूर्वी सदर परिसराला तारेचे कुंपण लावून चंदन बनाची सुरक्षा केली आहे. मात्र, या चंदन बणावर तस्करांची नजर पडल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. यातील पंधरापेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्याची चर्चा गावात येतात. यासंदर्भात येथील प्रहारचे पदाधिकारी विनोद लांजेवार यांनी तात्काळ दखल घेत सदर प्रकार नगरपालिका प्रशासन व व्याघ्र प्रकल्पाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर वनपाल चक्रधर खेरडे, वनरक्षक साजिद घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे नगराध्यक्ष विजया सोमवंशी यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
नगरपालिका परिसरातील चंदनाच्या पंधरापेक्षा अधिक झाडांची कत्तल अज्ञात चोरट्यांनी केल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात नगर परिषद प्रशासन व व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी केली आहे- विनोद लांजेवार, प्रहार पदाधिकारी, चिखलदराचंदन वृक्षतोडीसंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना किती वृक्षांची कत्तल झाली, याच्या माहितीसह कारवाईचे आदेश दिले आहेत.- विजया सोमवंशी, नगराध्यक्ष, चिखलदरा