अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अमरावती - परतवाडा मार्गावरील आसेगाव येथील पूर्णा नदीपात्रातील शासकीय कामावरून परस्पर रेती विकली जात आहे. नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. एकावेळी तीन ते चार ट्रक-टिप्पर रेतीची दिवसाढवळ्या तस्करी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे या विषयात कानावर हात आहेत. आसेगाव पूर्णा येथील पुलापासून काही अंतरावर भरदिवसा जेसीबीने नदीपात्रात उत्खनन करून रेती काढली जात आहे, तर मातीमिश्रित मटेरियल नदीच्या काठाला टाकले जात आहे. उत्तम दर्जाच्या निघालेल्या रेतीचे ढीग लगतच्या गावात रस्त्याच्या कडेला लावले जात आहेत. तेथून पुढे या रेतीची तस्करी खुलेआम होत आहे. चढ्याभावाने ही रेती विकली जात आहे. यात शासनाचा लाखो रुपयाच्या राजस्व बुडत आहे.
मानवनिर्मित डोह- पूर्णा नदीपात्रात रेती तस्करांनी केलेल्या उत्खननातून मोठे डोह यापूर्वीच तयार झाले आहेत, असे असतानाही पाटबंधारे विभागाने पूर्णा नदीपात्रात शासकीय निधीतून डोहनिर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. आसेगाव पुलापासून काही अंतरावर हा डोह निर्माण केला जात आहे. त्याकरिता जेसीबी लावून उत्खनन केले जात आहे.
नदीचे अस्तित्व धोक्यात- नदीची रेती तस्करांनी चाळण करून ठेवली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी त्यांनी मोठे खड्डे करून ठेवले आहेत. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासकीय कामातील रेती टिप्पर आणि ट्रकच्या मदतीने पळविली जात आहे. यामुळे नदीच्या काठावरील परिसंस्थाही धोक्यात आल्या आहेत.
पूर्णा नदीपात्रात डोहनिर्मितीचे काम सुरू आहे. केवळ एक टिप्पर आणि जेसीबी त्या ठिकाणी चालू आहे.- घनश्याम पवार, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग
घटनास्थळ आमच्या कार्यक्षेत्रात नाही. रेतीची तस्करी होत असेल तर ती थांबविला जाईल.- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर