नागपंचमी विशेष, साप हा शेतकऱ्यांचा मित्र, साप निघाल्यास घाबरू नका
अमरावती : साप हा शेतकऱ्यांच्या मित्र आहे. साप निघाल्यास त्याला मारू नका. नजीकच्या सर्पमित्रांना पाचारण करून त्याला सुखरूप पकडून देण्यासाठी सर्पमित्रांना सहकार्य करा. सापाला इजा पोहोचेल, जीव जाईल असले कृत्य करू नये, असे आवाहन वनविभागाने नागपंचमीचे औचित्याने नागरिकांना केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात. परंतु, बरेचदा साप बिनविषारी असतानासुद्धा अनेक जण घाबरतात. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी त्याला मारतात. मात्र, कोणत्याही प्रजातीचा साप निघाला तरी घाबरू नका. वनविभागाच्या १९२६ हेल्पलाईनवर संपर्क साधा. सर्पमित्र येईपर्यंत सापाजवळ जाऊ नका, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला.
जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये मण्यार, नाग, घोणस, फुरसे अशा सापाच्या चार प्रजाती प्रामुख्याने आढळतात. याशिवाय अन्य साप हे बिनविषारी असून, या सापांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, हे वास्तव आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, पिकांचे संरक्षण करण्यात त्याची मोठी मदत मिळते. त्यामुळे घरी अथवा शेतात साप आढळून आल्यास त्याला इजा न पोहचविता सुखरूपपणे त्याला वावर करू द्या, असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी केले.
----------------
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
मण्यार, नाग, घोणस, फुरसे
----------
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
धामण, कवड्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, बँडेड कुकरी, तस्कर, गवत्या, डुरक्या घोणस, मांडुळ
-------------
साप आढळला तर...
साप आढळला तर सर्पमित्राला बोलावा. तोपर्यंत सापाच्या जवळ जाऊ नका.
वनविभागाशी संपर्क साधून अधिकृत सर्पमित्राला घरी बोलवा. तेथपर्यंत लहान मुलांनी काळजी घ्यावी.
साप असलेल्या भागात किमान सात ते आठ फूट अंतर राखावे. कोणीही त्या भागात प्रवेश करू नये.
पावसाळ्यात साप हमखास निघतात. घाबरून न जाता सर्पमित्राला बोलावून सापाला पकडून द्यावे.
--------
साप शेतकऱ्यांचा मित्र
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. उभ्या पिकांना घुशी, उंदरांपासूनही नुकसान होते. साप हा पिकांचे नुकसान करणाऱ्या या प्राण्यांसह मोठे कीटक फस्त करण्यात मोठी मदत करतात. त्यामुळे घरी अथवा शेतात साप निघाल्यास त्याला मारू नका, तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे, यात दुमत नाही.
-------------------
साप चावल्यास घाबरू नये. ज्या भागात दंश केला असेल, त्याच्या वरील भागात घट्ट कापड बांधावे. शासकीय रुग्णालयातच उपाचारासाठी जावे. तथाकथित बुवांकडे औषधासाठी धाव घेऊ नये. वेळीच वैद्यकीय उपचार महत्त्वाचा आहे.
- नीलेश कंचनपुरे, सर्पमित्र, वार संघटना