टाकरखेडा संभू : कोणताही कृषी केंद्रधारक निविष्ठेसोबत अनावश्यक निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश तालुका कृषी विभागाने दिले आहेत.
शेतकरी बांधवांनी बियाणे /खते अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे व विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी. पावतीवर पीक, वाण, संपूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, रोख किंवा उधार पावती इत्यादी संपूर्ण तपशील असल्याची खात्री करूनच पावती घ्यावी खरेदी केलेल्या बियाणे /खताचे वेष्टन पिशवी व पक्की पावती तसेच त्यातील थोडे बियाणे पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावे. खते बियाणे खरेदी करताना बॅग सीलबंद असल्याची व अंतिम मुदत तसेच एमआरपी किंमत तपासूनच घ्यावी.
खरीप हंगामात बियाणे खते खरेदी करताना बियाणे किंवा खताच्या बॅगेवर नमूद असलेल्या किमतीपेक्षा आगाऊ दराने विक्री होत असल्यास, बॅगवर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी निविष्ठा आढळून आल्यास, किंवा निविष्ठा खरेदी करताना जर कृषी सेवा केंद्र संचालक एका निविष्टेसोबत दुसरी निविष्ठा अनावश्यक खरेदी करण्यास भाग पाडत असल्यास, आपण त्वरित कृषी विभाग, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी. अर्जासोबत सातबारा झेरॉक्स, बिलाची झेरॉक्स, टॅगची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची प्रत जोडावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे- पंडित यांनी केले आहे.