अमरावती : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज आहेत, विषयी प्रश्न विचारला असता तो भाजपचा अंतर्गत प्रश्न असून यावर भाष्य करणे योग्य नाही. पंकजा मुंडे माझी बहीण असून ज्यावेळी माझ्या पक्षाचे १४५ आमदार होईल त्यावेळी मी तिला मुख्यमंत्री करेन अशी भूमिका माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे मांडली.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती दौऱ्यावर असून दर्यापूर येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. आम्ही सोबत होतो म्हणून राज्यात भाजपच सरकार आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला कोण ओळखत होते, अशी टीका जानकर यांनी केली. भाजप छोट्या छोट्या पक्ष्याला टेकू बनवते आणि हे पक्ष मोठे व्हायला निघाले की खच्चीकरणाचे प्रयत्न केले जाते.
राधाकृष्ण विखे पाटील, आशिष देशमुख अशा अनेक नेत्यांना भाजपत आणून भाजपसुद्धा आता काँग्रेसच्या वाटेवर निघाली आहे. रासपला चार राज्यांत मान्यता मिळाली आहे. भाजपने आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला जागा दिली नाही, याचे शल्य असल्याचे जानकर म्हणाले. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविल्या जातील. आमची लढाई काँग्रेस, भाजप विरोधात आहे, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. पत्रपरिषदेला काशीनाथ शिंदे, प्रा. रमेश भिसे, अजित पाटील, अन्सार खान, अनिल मेश्राम आदी हजर होते.
मराठा आरक्षणाला विरोध नाही
मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण ओबीसीमधून देऊ नका किंवा ओबीसीचा कोटा वाढवा. मी एकट्या जातीचा नाही तर राष्ट्रीय समाजाचा नेता बनायचे आहे. मंत्री कोण्या एका जातीचा नसतो. मी मंत्री असताना दुग्ध व पशुसंर्वधन खाते एक नंबरवर नेले होते. आम्हाला भाजपमध्ये पक्ष विलीन करायचे म्हटले होते पण आम्ही झालो नाही, ही बाबदेखील महादेव जानकर यांनी स्पष्ट केली.