कुलसचिवांना निवेदन, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीच अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा घ्या
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २१ नव्हे तर २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी घेण्यात याव्या, अन्यथा दीक्षांत सोहळा उधळून लावू, असा निर्वाणीचा ईशारा संभाजी ब्रिगेड,,ऑल ईंडिया स्टुडंन्ट्स फेडरेशनच्यावतीने बुधवारी देण्यात आला. यासंदर्भात कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.
संत गाडगेबाबांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी असताना अमरावती विद्यापीठाने २१ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन कुणासाठी केले, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड,एआयएसएफने उपस्थित केला आहे. अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा दरवर्षी २० डिसेंबर रोजी गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्य घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा लांबणीवर पडला. असे असताना विद्यापीठ प्रशासनाने संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी दीक्षांत सोहळा न घेता पाहुण्यांच्या तारखेप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. गाडगेबाबा यांच्यापेक्षा आमंत्रित पाहुणे मोठे कसे झाले, असा सवाल संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. गाडगेबाबांची जयंती मोठी की पाहुण्यांसाठी मॅनेज केलेली तारीख मोठी, विद्यापीठाच्या अधिकारी, प्राधिकारणीला कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. दीक्षांत सोहळा २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करून विद्यार्थ्यांना याच दिवशी पदवी, पदकांनी सन्मानित करावे, अन्यथा हा सोहळा उधळून लावू. होणाऱ्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुभम शेरेकर, याेगेश चव्हाण, कैलास चव्हाण, निलेश सोनटक्के, राहुल खोडके, रोहन देढे, योगेश चव्हाण आदींनी निवेदन सादर केले.
००००००००००००००००००००