अमरावती : देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवा बघून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोन्ही कॅप्टननी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
राज्यात भाजप-शिवसेना यांच्यात महायुती झाल्यानंतर पहिला विभागीय कार्यकर्ता मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शक म्हणून बोलत होते. युती का झाली, हा प्रश्न विरोधकांना गोंधळात टाकणारा आहे. मात्र, ही युती सत्तेसाठी नव्हे तर राष्ट्रीयत्त्वासाठी झाली आहे. युती होऊ नये, ही विरोधकांची मनोमन इच्छा होती. परंतु, आता युती झाली असून ती अजोड असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मोदी व राज्य सरकारने केलेली विविध विकास कामे, योजनांचा पाढा त्यांनी वाचला. केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजना, विकास कामांमुळे विरोधक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची टीका त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा लढविणार असे जाहीर केले. पण, आता पवारांनी माघार घेतली. नांदेडमधून अशोक चव्हाण यांनीसुद्धा निवडणूक लढविणार नसून त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी लढणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार को हवा का रूख पता चलता है, असे म्हटले होते ते त्याचमुळे.अजित पवार तुम्ही कोठे आहात?तुम्ही जन्माला यायच्या पूर्वी शरद पवार हे राजकारणात आहेत, अशी टीका मध्यंतरी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी कॉन्व्हेंट, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, आमदारकी अन मुख्यमंत्रीपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. मी सर्वच परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. अजित पवार, तुम्ही कोठे आहात? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी चिचारताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.