अमरावती : कोल्हापूर येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काही समाज कंटक हे हेतुपुरस्पर त्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर खोटया अफवा प्रसारित करुन जातीय, धार्मिक तणाव निर्माण करुन येथील जातीय सलोखा नाहीसा करुन शहरातील शांतता भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी सोशल अलर्ट जाहिर केला आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी अमरावतीकरांनी खोटया अफवांवर विश्वास ठेऊ नये, अे आवाहन केले आहे. कुणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता भंग करणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हीडिओज अपलोड करू नयेत. घटनेची व माहितीची शहानिशा न करता ते व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट अथवा प्रसारित करणे, त्याला लाईक किंवा शेअर करणे अशा अफवेवर विवादीत टिप्पणी किंवा कमेंट्स करणे अशा बेकायदेशिर कृती करु नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
तर कठोर कार्यवाही
अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ति, समाज, धर्म, पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती पोस्ट करणा-या इसमाविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, भारतीय दंड संहिता कलम ५०५, १५३ (अ), २९५(अ) व इतर कलमांप्रमाणे कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
ग्रुप ॲडमिनलाही समज
सोशल मिडीयावरील कार्यान्वीत ग्रुप ॲडमिन व अकाउंट धारकांना देखील त्यासंबंधाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे समज देण्यात आली आहे. अमरावतीकरांनी शहरामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.